
परभणी, दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात आजपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून समाजातील शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात आणणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने हे अभियान परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे. तर नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दीपप्रज्वलन करून पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचविण्यावर भर दिला आहे. विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या लोकाभिमुख योजना पोहोचवून अभियान यशस्वी करावे.
परभणीचा ऐतिहासिक वारसा जगभर पोहोचवा
जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा- वारसा शिल्पसंपदेचा, मागवा पर्यटनाचा’ या कॉफी टेबल बुकच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे त्यांनी कौतुक केले. पुस्तकाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
परभणी जिल्ह्याची ऐतिहासिक व पर्यटन ओळख देशभर तसेच जगभर पोहोचविण्यासाठी या कॉफी टेबल बुकचा व्यापक वापर करावा. देशातील विविध विमानतळांवर हे पुस्तक उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. उत्कृष्ट पद्धतीने कॉफीटेबलची निर्मिती केल्याबद्दल पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत’ राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच कॉफी टेबल बुकच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी कॉफी टेबलच्या निर्मितीसाठी सहकार्य करणारे डॉ. आत्माराम शिंदे यांचे प्रतिनिधी डॉ. डोल्हारे, मल्हारीकांत देशमुख, अनिल स्वामी, डॉ. सीमा नानवटे, प्रा. अनिल बडगुजर, नागेश जोशी, डॉ. निळकंठ काळदाते, वैजनाथ काळदाते, प्रल्हाद पवार, सिद्धार्थ कांबळे, सुधीर देऊळगावकर, संजय ठाकरे, उज्वल पंडित, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक रोहित जैस्वाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा मुख्य समन्वयक (परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समिती) पवन खांडके यांचा यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्रे व मंजुरीचे आदेश वितरित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लिफ्टचे उदघाटन
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या लिफ्टचे उदघाटन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. दिव्यांग व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने उभारलेल्या या सुविधेचे यावेळी कौतुक करण्यात आले.
००००

Leave a Reply