
मुंबई, दि. १६ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सिंगरवाडी, उडती, औसापूर, पांडुरणा, ब्राह्मणगाव, शांपूर, वडगाव आदी गावांचा एकत्रित विचार करून एक किंवा दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करावा. तसेच ब्राह्मणगावसह 13 गावांसाठी पुस प्रकल्पातील जलसाठ्याचा उपयोग करून शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा तसेच पुस प्रकल्पातून ब्राह्मणगावसह 13 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाबाबत मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील सद्यस्थितीत या गावांसाठी जिल्हा परिषदेमार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असून काही गावांतील विद्यमान जलस्रोत उन्हाळ्यात अपुरे पडल्यास या गावांना दीर्घकालीन आणि शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्थेचा तांत्रिक अभ्यास करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
पुस प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचा ब्राह्मणगावसह संबंधित गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून उपयोग करता येईल का, याची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक व्यवहार्यता तपासावी. यासाठी गावांचे अंतर, भौगोलिक स्थिती, उंचसखल प्रदेश, आवश्यक पाइपलाइन, उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील लोकसंख्येची पाण्याची गरज या बाबींचा एकत्रित विचार करून अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
सिंगरवाडी, उडती, औसापूर, पांडुरणा, ब्राह्मणगाव, शांपूर, वडगाव आदी गावांचा एकत्रित विचार करून एक किंवा दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य आहेत का, याचा अभ्यास करावा. या योजनांसाठी विद्यमान पाणीपुरवठा योजनांमध्ये उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा शक्य तितका उपयोग करावा. आवश्यक त्या ठिकाणी योजनांचे पुनरीक्षण करून अनावश्यक अतिरिक्त खर्च टाळण्याच्या दृष्टीने उपलब्ध पर्याय तपासावेत, असेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर तसेच प्रगतीपथावर असलेल्या योजनांमधील जलस्रोतांची सद्यस्थिती तपासावी. ज्या गावांमध्ये विद्यमान जलस्रोत शाश्वत नाहीत किंवा उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होते, अशा गावांच्या योजनांचा फेरआढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी जलस्रोत निश्चित करावा. आवश्यक असल्यास अशा गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
गोंडमांजरी येथील पाणीपुरवठ्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. गावासाठी उपलब्ध जलस्रोत, धरणापासूनचे अंतर आणि आवश्यक पाइपलाइन यांचा विचार करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा साठा करता यावा, यासाठी आवश्यकतेनुसार बॅलन्स टँक उभारावी, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ

Leave a Reply