थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

नवोन्मेषाच्या बळावर एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

नवोन्मेषाच्या बळावर एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

मुंबई, दि. १६ : नवोन्मेष करूया, इनक्युबेशनला चालना देऊया आणि एकत्रितपणे व्यापक परिणाम साधूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशातून महाराष्ट्राच्या नवोन्मेषाधारित विकासाचा संकल्प सिंगापूर येथे आयोजित ‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये जागतिक समुदायासमोर मांडण्यात आला. एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याच्या महाराष्ट्राच्या संकल्पाचा निर्धार त्यांनी या परिषदेद्वारे जागतिक व्यासपीठावर मांडला.

आशियातील दोन हजारांहून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी, जागतिक नेते, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ‘इनोव्हेशन लेड इकॉनॉमी’ म्हणून विकसित करण्यावर भर देत नवोन्मेषाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट त्यांनी अधोरेखित केले.स्टार्टअप्स, संशोधन संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि युवा नवोन्मेषक यांना सक्षम व सर्वसमावेशक परिसंस्थेत जोडून प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील अग्रगण्य इनोव्हेशन हब बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांचे उद्घाटनपर भाषण

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांचे परिषदेत उद्घाटनपर मुख्य भाषण झाले. यावेळी डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रातील सक्षम स्टार्टअप परिसंस्था, युवा नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, इनक्युबेशन सुविधा, डीप-टेक क्षेत्रातील संधी तसेच राज्यातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याच्या धोरणाची माहिती दिली.

महाराष्ट्र आणि आशियातील विविध देशांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना द्यावी, इनक्युबेशन परिसंस्था अधिक मजबूत करावी आणि त्यातून व्यापक सामाजिक व आर्थिक परिणाम साधावा, असे आवाहनही परिषदेत करण्यात आले. देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डीपफेक प्रतिबंधक तंत्रज्ञान, फिनटेक, क्लीनटेक, रोबोटिक्स आणि अन्य उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये राज्याचे अग्रस्थान कायम राखण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यात स्टार्टअप्स, नवोन्मेष, प्रगत तंत्रज्ञान, इनक्युबेशन, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणी या क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.

000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *