थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

क्लस्टर स्टार्टअपसाठी सर्वेक्षण करून नवीन क्लस्टर उभारणीला चालना द्यावी – मंत्री डॉ. उदय सामंत

क्लस्टर स्टार्टअपसाठी सर्वेक्षण करून नवीन क्लस्टर उभारणीला चालना द्यावी – मंत्री डॉ. उदय सामंत

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत सामायिक सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजूर प्रकल्प किमतीच्या ८० टक्के शासन अनुदान आणि २० टक्के विशेष हेतू वाहन संस्थेचा सहभाग, अशी निधी रचना लागू करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच क्लस्टर स्टार्टअपसाठी सर्वेक्षण करून नवीन क्लस्टर उभारणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

मंत्रालयात उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत शासनाच्या अनुदान मर्यादेबाबत बैठक झाली. सामायिक सुविधा केंद्रांच्या माध्यमातून औद्योगिक समूहातील उद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा व सामायिक सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच क्लस्टरच्या विकासाला अधिक गती देण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

सामायिक सुविधा केंद्राच्या प्रस्तावांना गती देण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात यावेत. तसेच सामायिक सुविधा केंद्रासाठी आवश्यक सुधारणांसह शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही करावी, असेही मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

सामायिक सुविधा केंद्रासाठी जमीन व इमारतीच्या किमतीवरील खर्चाची पूर्तता विशेष हेतू वाहन संस्थेमार्फत करण्यात येईल. तथापि, १०० टक्के महिला सदस्य किंवा १०० टक्के अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य असलेल्या औद्योगिक समूहांच्या विशेष हेतू वाहन संस्थेसाठी ९० टक्के अनुदानाच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून मंजूर प्रकल्प किमतीच्या २५ टक्के मर्यादेत इमारत बांधकामाचा खर्च शासन अनुदानातून अनुज्ञेय राहील, असेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विविध औद्योगिक समूहांची क्षमता, गरजा आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा अभ्यास करून क्लस्टर स्टार्टअपसाठी आवश्यक सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणाच्या आधारे संभाव्य नवीन क्लस्टरची ओळख करून त्यांची उभारणी सुलभ होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्तालयाच्या सहआयुक्त मृणालिनी देवराज, उद्योग विभागाचे कक्ष अधिकारी राजीव राजमाने, जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरीचे सं. र. कदम, संजीवन हेल्थ फूड्स प्रा. लि.च्या संचालिका मुग्धा करंबळेकर, योजक फूड्सचे संचालक आनंद भिडे, श्रीकांत भिडे आदी उपस्थित होते.

००००

गजानन पाटील/विसंअ

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.