थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल – मंत्री शंभूराज देसाई

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन जगभरातील पर्यटकांना घडविणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील विविध गणेशमंडळांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यामध्ये फिनलंड, फ्रान्स, थायलंड, नॉर्वे, चीन, बेल्जियम, स्वीडन आणि इजिप्त या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचा गणेशोत्सव, त्याची ऐतिहासिक परंपरा आणि मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती या प्रतिनिधींना देण्यात आली.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, सामाजिक एकतेचे आणि लोकसहभागाचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा, इतिहास, लोकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांना दिली भेट

माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात परदेशी पाहुण्यांचे पारंपारिक फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी मुंबईतील ऐतिहासिक आणि लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांतील गणेशाचे दर्शन घेतले. माटुंगा येथील जी.एस.बी. गणपती, वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव-गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’, गिरगावातील केशवजी नाईक चाळ येथे भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा होणारा प्रमुख उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, लोकपरंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश याची माहिती पाहुण्यांना देण्यात आली.

विविध देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग

गणेशोत्सवाच्या निमित्ताने फिनलंडच्या उप वाणिज्यदूत  जोन्ना सुनी, फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हरिनो आणि सामंथा नुवेल, थायलंडच्या वाणिज्यदूत सिरिपॉर्न सुपानिमितविसेतकुल, वाणिज्यदूत थितीपोर्न चुचिन्नावत, नाक्रिसोर्न क्लाइकाओ आणि व्हाइस कॉन्सुल अरुणलुक इम्सुब यांनी सहभाग घेतला. नॉर्वेच्या वाणिज्यदूत मोनिका ओम्मुंडसेन नागेलगार्ड आणि जेनी ब्रँडाल, बेल्जियमचे वाणिज्यदूत पियरे स्टेव्हर्लिन्क तसेच स्वीडनच्या वाणिज्यदूत यांच्या पत्नी साने यामादा यांची उपस्थिती होती. चीनच्या वतीने वाणिज्यदूत जी श्युएचुई, कॉन्सुल वांग जिनशेंग, उपवाणिज्यदूत मा झोउचेन, झू युचियान, लिन, वू तसेच कॉन्सुलेटमधील अन्य अधिकारी व कुटुंबीय सहभागी झाले. इजिप्तच्या वाणिज्यदूत जनरल दिना अल अहे यांचाही सहभाग होता.

यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परदेशी मान्यवरांचे या उपक्रमाला भेट दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, मुंबई शहरचे अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि व्यवस्थापक मानसी कोठारे उपस्थित होते.

0000000

संध्या गरवारे/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *