गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न – मंत्री ॲड. आशिष शेलार – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न – मंत्री ॲड. आशिष शेलार


दुवा कॉपी केला!

गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जागतिक व्यासपीठावर अधोरेखित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या सहकार्याने गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रेक्लेमेशन येथे ‘Bappa.org’ आणि महाराष्ट्र गणेश उत्सव राज्य महोत्सवाच्या अधिकृत लोगोचे थाटामाटात अनावरण करण्यात आले. यावेळी अभिनेते रितेश देशमुख, नेहा पेंडसे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, श्रीपाद आष्टीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरविले आहे. आस्था, श्रद्धा, निष्ठा आणि परंपरेची सांगड घालणारा हा उत्सव धार्मिक व अध्यात्मिक असून सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचेही प्रभावी माध्यम आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुजविलेली ही लोकचळवळ घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवांच्या माध्यमातून आजही जतन केली जात असल्याचे ॲड. शेलार यांनी नमूद केले.

‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर देश-विदेशातील घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्याद्वारे जगभरातील भाविकांना महाराष्ट्राच्या या समृद्ध उत्सवपरंपरेत सहभागी करून घेता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला १२ फुटी भव्य मोदकाचा फिरता चित्ररथ सादर करण्यात आला. गणरायाची प्रतिमा, लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सवाच्या परंपरेशी निगडित कलात्मक बाबींचा समावेश असलेला हा चित्ररथ वर्षभर राज्यभर फिरविण्यात येणार असून, त्यातून राज्य महोत्सवाची व्याप्ती, लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार केला जाणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

00000

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *