थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

तिरुवनंतपुरम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्र-केरळ सांस्कृतिक संगम

तिरुवनंतपुरम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्र-केरळ सांस्कृतिक संगम

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. १६ : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांतील रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केरळमधील तिरुवनंतपुरम येथे करण्यात आले आहे. गुरुवार, 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत अभेदाश्रमम् हॉल, पद्मतीर्थमसमोर, श्री पद्मनाभस्वामी मंदिराजवळ, तिरुवनंतपुरम, केरळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि केरळच्या सांस्कृतिक परंपरांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. गणेशोत्सवावरील सांस्कृतिक सादरीकरण, मराठी गीते, मल्याळम भाषेतील गीते, गणपतीची भक्तिगीते व भजने, केरळमधील ग्रामीण व पारंपरिक सांस्कृतिक कलाप्रकारांचे सादरीकरण तसेच महाराष्ट्र-केरळच्या कलाकारांचा सांस्कृतिक फ्युजन व संयुक्त कलाविष्कार या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

केरळम् क्षेत्र संरक्षण समिती, महानगरम्, तिरुवनंतपुरम यांच्या समन्वयाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरांबरोबरच केरळच्या स्थानिक ग्रामीण आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण होणार असल्याने या कार्यक्रमातून दोन्ही राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची परस्पर ओळख आणि सांस्कृतिक देवाणघेवाण साधली जाणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासोबतच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशाच्या विविध भागांत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून तिरुवनंतपुरम येथील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्र आणि केरळच्या सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.