
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई, दि. २४ : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नोंदणीकृत ग्रामीण कारागीर आणि बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मंत्रालयात चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांपर्यंत ग्रामीण कारागीर व बचतगटांची उत्पादने पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण स्वावलंबनासह खादी व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंडळातर्फे दरवर्षी राज्यभर उत्साहाने साजरी करण्यात येते.
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
0000
गजानन पाटील/विसंअ

Leave a Reply