
मुंबई, दि. २३: राज्यातील पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलसंधारण, कृषी, वीजपुरवठ्याशी संबंधित विषयांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
महसूलमंत्री मंत्री बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राज्यातील काही भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस प्रशासनाने दुष्काळसदृश परिस्थितीतील उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करावे.
पीक नुकसानीचे पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावे
पावसाच्या खंडामुळे पिकांवर झालेल्या परिणामाचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि ग्रामसभेत मांडण्यात यावे. तसेच पंचनाम्याची कार्यपद्धती स्पष्ट करणारी एसओपी तातडीने तयार करावे. तसेच डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाला गती द्यावी. जलसंधारणाच्या कामांना गती देतानाच भूजलपातळी वाढविण्यासाठी पाणी जमिनीत मुरविणाऱ्या उपाययोजनांवर भर द्यावा. उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करावे.
सध्याच्या परिस्थितीत सिमेंट रस्ते आणि इतर नियमित विकासकामांच्या तुलनेत जलसंधारण, पिण्याचे पाणी, कृषी आणि आपत्कालीन स्वरूपाच्या कामांना प्राधान्य द्यावे. अंगणवाडीतील आवश्यक सुविधा व सेवा सुरळीत राहतील याकडे लक्ष द्यावे महावितरणशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन प्रशासकीय नियंत्रण ठेवावे. असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

सेवा संकल्प अभियानातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती द्यावी– मुख्य सचिव राजेश अग्रवाल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानातून’ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा माहिती देण्यासाठी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव विनय विपुल, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
००००
काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply