थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

मुंबई, दि. १७: नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या सूचनेनुसार ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात झाली. या अभियानांतर्गत विविध वॉर्डांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून लोकसहभाग आणि निस्वार्थ जनसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.

‘डी’ वॉर्डमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत, ‘डी’ वॉर्ड कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जसलोक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, आरोग्य तपासणी करण्यात आली. परिसरातील एकूण ४५ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

‘ई’ वॉर्डमध्ये महारक्तदान शिबिर

सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा आरोग्य विभागाच्या वतीने ‘ई’ वॉर्ड मधील घोडपदेव येथे ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ महारक्तदान शिबिराने झाला. घोडपदेव सार्वजनिक मंडळ आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरातून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्यात आली. या रक्तदान शिबिरातून अभियानातील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांची सुरुवात झाली असून, यातून नागरिकांमध्ये लोकसहभागाचा सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला आहे.

‘ए’ वॉर्डमध्ये वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन

मनपा उद्यान विभाग, ‘ए’ वॉर्डच्या वतीने फोर्ट परिसरातील शहीद भगतसिंग मार्गावर राजपुष्प असलेल्या ‘ताम्हण’च्या दोन वृक्षांचे रोपण करण्यात आले. ‘ए’ वॉर्डचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करून ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला.

प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रमांमधून केवळ नागरिकांच्या आरोग्याचीच काळजी घेतली नाही, तर हरित आणि निरोगी परिसराचा संकल्पही अधिक दृढ केला आहे.

000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *