थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्यातील गणेश मंडपात रंगला ‘लोकसंवाद’

मुंबई उपनगर जिल्ह्यातील गणेश मंडपात रंगला ‘लोकसंवाद’

मुंबई उपनगरातील सांताक्रूझ, वाकोला व कलिना परिसरातील गणेश मंडळांमध्ये शासकीय योजना, सेवा आणि रोजगाराच्या संधींची जनजागृती

मुंबई, दि. २२ : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला लोकजागृतीची जोड देत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद 2026’ या उपक्रमातून मुंबई उपनगरातील गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सांताक्रूझ पूर्व आणि कलिना परिसरातील गणेश मंडळांमध्ये गणेशभक्त, रहिवासी, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

सांताक्रूझ (पूर्व) येथील सेंट मेरी स्कूलजवळील ‘सहयोग मित्र मंडळा’मध्ये अध्यक्ष अमर कुचिकुर्वी, खजिनदार संतोष अन्नारेड्डी आणि सचिव आदित्य अण्णारेड्डी यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी कसा घ्यावा, संबंधित विभागांकडून उपलब्ध सेवा कोणत्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

सांताक्रूझ (पूर्व) येथील संतोष हॉटेलजवळील ‘वाकोल्याचा मोरया’ – साई दृष्टी मित्र मंडळात अध्यक्ष विशाल पवार, खजिनदार प्रेम काटकर आणि सचिव वडीवेल पंढराम यांच्या उपस्थितीत लोकसंवादाचा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सवासाठी एकत्र आलेल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी या संवादाचा उपयोग करण्यात आला.

कालिना विद्यापीठासमोरील माणिपाडा परिसरातही ‘लोकसंवाद 2026’ला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘कालिना, माणिपाडाचा महाराजा’ – माणिपाडा रहिवासी सेवा संघ येथे अध्यक्ष विजय तांद्रा, खजिनदार समित कोटियन आणि सचिव केव्हिन कुराय्या यांच्या उपस्थितीत नागरिकांशी संवाद साधण्यात आला.

त्याच परिसरातील ‘माणिपाडाचा राजा’ – माणिपाडा सार्वजनिक मित्र मंडळात अध्यक्ष अनिल जाधव, खजिनदार संजय पवार आणि सचिव निशांत सालियन यांच्या उपस्थितीत शासकीय सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. ‘विद्यानगरीचा विघ्नहर्ता’ – विद्यानगरी युथ ग्रुप, माणिपाडा येथे अध्यक्ष रोहित साहू, खजिनदार विकास साहू आणि सचिव राजू साहू यांच्या उपस्थितीत युवक व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. विशेषतः युवकांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

गणेश मंडप बनले माहितीचे व्यासपीठ

गणेशोत्सवात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गणेश मंडळांना भेट देत असल्याने गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्याचा अभिनव प्रयत्न ‘लोकसंवाद 2026’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिकांना केवळ योजनांची माहिती देण्याबरोबरच पात्रता, अर्जाची प्रक्रिया, संबंधित शासकीय कार्यालय आणि उपलब्ध सुविधांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

युवक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधांची माहितीही देण्यात आली. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेशी संबंधित संधींची माहिती देत उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सहकार्य

‘लोकसंवाद 2026’ उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क विभागासोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत लोकसंवाद उपक्रमाचे समन्वयन केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश अपंडकर यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्यामुळे ही लोकसंवाद मोहीम मुंबई उपनगरात यशस्वीपणे राबविण्यात आली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून उत्सव, जनजागृती आणि शासकीय योजनांची माहिती यांचा संगम साधत ‘लोकसंवाद 2026’ उपक्रम मुंबई उपनगरातील विविध भागात नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे शासनाच्या योजना आणि सेवा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यास मदत होत आहे.

००००

बी.सी. झंवर/विसंअ

संजय ओरके/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *