थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, २४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबई मनपा शाळांतील १.२७ लाख विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘विकसित भारत’

मुंबई मनपा शाळांतील १.२७ लाख विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारला ‘विकसित भारत’

मुंबई, दि. २४ : विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत मुंबईतील १,०४३ मनपा शाळांमधील तब्बल १ लाख २७ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, आपल्या कल्पकतेतून ‘विकसित भारत’ आणि सेवाकार्यांचे रंगीबेरंगी चित्रविश्व साकारले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. २२) चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग म्हणजे त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला मिळालेली मोठी संधी ठरली आहे.

कल्पकतेला मिळाली ‘विकसित भारत’ची जोड

‘विकसित भारत’ आणि ‘पंतप्रधान महोदयांनी केलेली सेवाकार्ये’ या प्रेरणादायी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचे रंग भरले. इयत्ता पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला ९२४ शाळांमधील १ लाख १० हजार २०७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढून १ लाख २७ हजार ५६९ वर पोहोचली. विद्यार्थ्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद अभियानाची व्यापक पोहोच अधोरेखित करणारा आहे.

शाळाशाळांत रंगांची उधळण; मान्यवरांकडून कौतुकाची थाप

मुंबईतील विविध मनपा शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचा उत्साह अनुभवायला मिळाला. जी-दक्षिण विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शाळा, ई-विभागातील एमपीएस न्यू भायखळा इंग्रजी शाळा आणि एफ-उत्तर विभागातील नाडकर्णी पार्क मनपा शाळा संकुल, वडाळा यांसह विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. या कौतुकामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

आज उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन; प्रत्येक शाळेतील २४ कलाकृतींचा गौरव

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती सर्वांना पाहता याव्यात, यासाठी गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी प्रत्येक शाळेच्या सभागृहात किंवा व्हरांड्यात चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी विद्यार्थी आणि पालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत तीनही गटांतून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि पाच उत्तेजनार्थ अशी प्रत्येकी आठ उत्कृष्ट चित्रे निवडली जाणार आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेतील एकूण २४ उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करण्यात येईल.

महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार ॲड. पराग आळवणी, शिक्षण समिती सभापती श्रीमती राजश्री शिरवडकर, नगरसेविका श्रीमती आशा मराठे, नगरसेवक महादेव शिवगण, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक मिलिंद शिंदे, नगरसेविका श्रीमती ममता यादव, नगरसेविका श्रीमती कल्पेशा कोठारी, नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी तसेच शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरतकुडवे आणि इतर अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *