थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबई शहरात ९वा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात संपन्न

मुंबई शहरात ९वा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात संपन्न

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. १ : महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ९व्या राष्ट्रीय पोषण माहचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत माता, बालके, किशोरवयीन मुली तसेच नागरिकांमध्ये पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.

मुंबई शहरातील विविध बाल विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण व आरोग्य जनजागृती, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, पौष्टिक आहाराचे महत्त्व, स्थानिक पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन, गर्भवती व स्तनदा मातांसाठी आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, तसेच किशोरवयीन मुलींसाठी पोषण व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच पोषणविषयक संदेश, रॅली, शपथ, चर्चासत्रे, पालक बैठका आणि माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पोषण माहाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पीएमएमव्हीवाय) बाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. पात्र गर्भवती व स्तनदा मातांना योजनेची माहिती देऊन नोंदणी व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे, नोंदणीस प्रोत्साहन देणे, तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांचे वजन व उंची घेऊन त्यांच्या वाढीचे नियमित निरीक्षण करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. पोषण ट्रॅकर तसेच विविध पोषणविषयक शासकीय योजनांबाबतही लाभार्थी व पालकांना माहिती देण्यात आली.

पोषण हा केवळ एका विभागाचा विषय नसून कुटुंब, समाज आणि शासन यांच्या सामूहिक सहभागातूनच सुदृढ व कुपोषणमुक्त समाजाची निर्मिती शक्य आहे, हा संदेश विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात आला. या अभियानात महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच लाभार्थी माता, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.