
मुंबई, दि. १६ : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून विविध आरोग्यविषयक योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वयस्कर नागरिकांमध्ये मोतीबिंदूमुळे निर्माण होणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन’ अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे. या अनुषंगाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधिष्ठाता व नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. रवी चव्हाण यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया कार्यक्रमासाठी राज्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावरील उपाययोजनांसाठी सन २०१७ पासून ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन’ सुरू करण्यात आले असून, सन २०१८ मध्ये या मिशनची नव्याने सुरुवात करण्यात आली. राज्यातील एकही पात्र नागरिक उपचाराअभावी मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन राहू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिशनची व्याप्ती वाढवून शस्त्रक्रियांचा अनुशेष नियोजनबद्ध पद्धतीने दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या २०२७ पर्यंत ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य करण्यासाठी राज्य शासनाने शस्त्रक्रियांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा वाढता अनुशेष लक्षात घेऊन राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रलंबित असलेल्या सुमारे २८ ते ३० लाख शस्त्रक्रियांचा अनुशेष आगामी तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रियांची संख्या वाढविणे, विविध यंत्रणांमध्ये सुसूत्रता निर्माण करणे तसेच कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. रवी चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील पात्र रुग्णांपर्यंत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा व साधनसामग्रीचा योग्य वापर करून शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येणार असून, विविध शासकीय व आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय साधून अनुशेष कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोतीबिंदूमुळे येणारे टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न सुरू आहेत. ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ हे केवळ शासकीय अभियान न राहता प्रत्येक पात्र नागरिकाला वेळेत उपचार मिळवून देणारे प्रभावी आरोग्य अभियान म्हणून राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. निर्धारित कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्ण करून २०२७ पर्यंत मिशन यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा हा अनुशेष निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येईल, असा विश्वास डॉ. रवी चव्हाण यांनी व्यक्त केला असून, राज्याचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
00000

Leave a Reply