थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’

राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’

मुंबई, दि. १६ – शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, जबाबदार नागरिकत्व आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राज्य शासनाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असलेले विविध शैक्षणिक, सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

अभियानांतर्गत ‘विकसित भारत – २०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विकसित भारत, राष्ट्रनिर्मिती, पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यासारख्या विषयांवर आपली मते मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृती व सादरीकरणांचे शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रदर्शन करण्यात येणार आहे.

२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, माहितीपर कार्यक्रम तसेच उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान यांचाही समावेश असेल.

‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, जलसंवर्धन, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, फिट इंडिया, वीरगाथा, दिव्यांगजन सहाय्य, मतदार जागृती, व्होकल फॉर लोकल, व्यसनमुक्ती तसेच पोषण व ॲनिमिया जनजागृती यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता, वंचित मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शाळांमध्ये ‘विकसित भारत – २०४७’ या विषयावर विशेष जनजागृती सत्रे आयोजित करून गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम, स्वच्छता, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत प्रत्येक शाळेच्या वतीने स्थानिक गरजा लक्षात घेऊन किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग राहील. उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ या भावनेवर आधारित सेवा संकल्प घेण्यात येणार आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संचालक यांच्यावर विविध स्तरांवरील समन्वय व नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपक्रमांचे छायाचित्रण, व्हिडीओ दस्तऐवजीकरण आणि यशोगाथांचे संकलन करून त्याचा प्रसार करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व शाळांनी या अभियानातील उपक्रम प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव दृढ करण्यासाठी सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा, तथापि विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमातील सहभाग ऐच्छिक राहील, असे शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

बी.सी. झंवर/विसंअ

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *