थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचा वापर करा

‘लोककलेतील श्रीगणेश’ विशेष टपाल तिकिटाचा वापर करा

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष कार्यक्रमात मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन त्याअनुषंगाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या गणेशोत्सवामध्ये व्यापक लोकसहभाग, कल्पकता, नावीन्य, कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा संगम दिसतो. गणेशोत्सवाच्या प्रथा-परंपरा महाराष्ट्रासह देश-विदेशात विस्तारल्या आहेत. या उत्सवाचे वैश्विक आणि अद्वितीय सांस्कृतिक मूल्य जगासमोर मांडण्यासाठी आवश्यक व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. त्याची पहिली पायरी म्हणून राज्य शासनाने गतवर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला.राज्य महोत्सवाच्या माध्यमातून राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रवींद्र नाट्य मंदिरात तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून, ओडिशा, अंदमान-निकोबार आणि दुबई येथेही राज्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर दरवर्षी एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे जतन व संवर्धन करणे आणि त्याला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

‘लोककलेतील श्रीगणेश’ टपाल तिकिटातून सांस्कृतिक वारशाचे जतन

महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी सांगितले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणले. सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती आणि स्वातंत्र्यलढ्यातही या उत्सवाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज गणेशोत्सव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

भारत सरकारचा टपाल विभाग टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशाची कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे जतन व प्रसारण करतो. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या संकल्पनेवरील ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे कायमस्वरूपी जतन करणारे फिलाटेलिक स्मृतिचिन्ह ठरेल, असे जायभाये यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नव्या पिढीमध्ये टपाल तिकिटे आणि फिलाटेलीविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी सांगितले. त्यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.

0000

संजय ओरके/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *