
मुंबई, दि. २५ : माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गुरुवारी लोकसंवाद उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळील बी.टी. मार्ग परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या लोकसंवाद उपक्रमास जी.टी. हॉस्पिटल मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अजित धामणस्कर, खजिनदार साई सुर्वे, सचिव उदय मोरे, पोलीस आयुक्त कार्यालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यश शेलार, श्रीधर मोहिते, तसेच मंगलदासचा राजा, मंगलदास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, क्रॉफर्ड मार्केट परिसरातील भाविक व नागरिक उपस्थित होते.

यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबाबत सोमनाथ आहेर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी लोकसंवाद उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. आयुष्मान कार्डबाबत वरिष्ठ सहायक संचालक मनीषा सावळे यांनी माहिती दिली.
सोमनाथ आहेर यांनी सांगितले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-१) आणि गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-२) राबविण्यात येतात. व्यवसाय किंवा उद्योगासाठी संबंधित बँकेकडून कर्ज मंजूर व वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास, पात्र व्याजाचा परतावा महामंडळामार्फत दिला जातो. या योजना ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत कर्जमर्यादा वाढविण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार कमाल १२ टक्के वार्षिक दराने, निर्धारित कालावधीसाठी पात्र व्याजाचा परतावा देण्यात येतो. गट कर्ज व्याज परतावा योजनेत गटातील सदस्यसंख्येनुसार कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पात्र गटाने कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास नियमानुसार व्याज परतावा अनुज्ञेय आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. पात्रता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अहवाल व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेकडे कर्जासाठी अर्ज करावा. कर्ज मंजुरीचा निर्णय बँक आपल्या नियमांनुसार घेते. कर्ज मंजूर व वितरित झाल्यानंतर कर्जमंजुरी, कर्जवाटप, हप्त्यांचे वेळापत्रक आणि त्यानंतर वेळेत भरलेल्या हप्त्यांच्या आधारे व्याज परताव्याचा दावा ऑनलाईन सादर करता येतो, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी नागरिकांनी योजनांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
0000
वंदना थोरात/विसंअ

Leave a Reply