थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. २२ : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एकदिवसीय विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करावीत, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या संमेलनांमध्ये युवा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग राहील, यासाठी विद्यापीठांनी विशेष नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत ऑनलाइन बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून घेण्यात आली. यावेळी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत उपस्थित होते. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, मराठी भाषा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे २८ जानेवारी २०२७ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. या संमेलनाचे औचित्य साधून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि साहित्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

सर्व विद्यापीठांनी ही संमेलने एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या तारखांना आयोजित करावीत, जेणेकरून विविध ठिकाणी होणाऱ्या साहित्यविषयक उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.

‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रमाचे आयोजन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या उपक्रमाचे आयोजन राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

मुंबई विद्यापीठ येथे ३ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून, त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ५ ऑक्टोबर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ६ ऑक्टोबर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ७ ऑक्टोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ८ ऑक्टोबर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे ९ ऑक्टोबर, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे १० ऑक्टोबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे ११ ऑक्टोबर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे १२ ऑक्टोबर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १३ ऑक्टोबर, संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे १४ ऑक्टोबर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे १५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि संबंधित महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *