थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २३ : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या सामाजिक न्याय विभागातील ३९ नवनियुक्त सहायक आयुक्त व जिल्हा समाजकल्याण अधिकारी (गट-अ) यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, समाज कल्याण अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पवार, खाजगी सचिव नितेश भंडारे, विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल यांच्यासह मंत्रालय व समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेच्या प्रवासास समर्पित ‘सेवा संकल्प अभियान’ राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि संकल्प या भावनेतून प्रशासकीय यंत्रणेने अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने कार्य करण्याचा संदेश देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागात नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

नवनियुक्त अधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. समाजातील वंचित, दुर्बल, पीडित, दलित तसेच दिव्यांग घटकांच्या आशा-आकांक्षा आणि शासनाच्या कल्याणकारी योजना यांच्यामध्ये सामाजिक न्याय विभाग महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा जपावी. कार्यालयीन कामकाजासोबतच क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांच्या अडचणी आणि योजनांच्या परिणामकारकतेचा आढावा घ्यावा. प्रशासन आणि लाभार्थी यांच्यातील दुवा अधिक सक्षम करून नागरिकांना शासनाच्या योजनांचा सुलभतेने लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि लोकाभिमुखता आणणे ही काळाची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक हा प्रशासनाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. सामाजिक न्याय विभागाची प्रतिमा अधिक सक्षम करण्यासाठी नवनियुक्त अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

क्षेत्रीय कामकाजाला प्राधान्य देण्याचे आवाहन

समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पवार यांनी ३० वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभव नवनियुक्त अधिकाऱ्यांसमोर मांडला. सामाजिक न्याय विभागाचे काम हे केवळ कार्यालयीन स्वरूपाचे नसून त्याला प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजाची जोड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करणे यासाठी क्षेत्रीय अनुभव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवनियुक्त अधिकाऱ्यांना मिळालेली नियुक्ती ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची संधी आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविताना नियमांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थीकेंद्रित दृष्टिकोन आणि उत्तरदायित्वाची भावना जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आभार सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल यांनी मानले. यावेळी सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय तसेच समाज कल्याण आयुक्तालय येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

अश्विनी पुजारी/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *