
मुंबई, दि. २३ : अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या भव्य गणेश विसर्जन सोहळ्याचा अनुभव परदेशी पर्यटकांना घेता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे विशेष दालन उभारण्यात येणार आहे. या विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, गणेशोत्सवाचे ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व तसेच विसर्जन सोहळ्याचे भव्य स्वरूप जवळून अनुभवता येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “समृद्ध सांस्कृतिक परंपरा हे राज्याच्या पर्यटनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि उत्सवांचा आंतरराष्ट्रीय पर्यटकांना परिचय करून देण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवासारख्या लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनवाढीस चालना देण्यात येत आहे.”
गणेश विसर्जनाचा हा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांना गणपती मिरवणुकीचे दर्शन घेण्याबरोबरच गणरायाची पूजा, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणामध्ये पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडणार आहे.
मुंबईतील गणेशोत्सवाला लाभलेली व्यापक लोकसहभागाची परंपरा, विविध गणेश मंडळांची सजावट, मिरवणुका आणि विसर्जन सोहळा यामुळे या उत्सवाला विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. या सांस्कृतिक अनुभवाचे नियोजनबद्ध पद्धतीने पर्यटकांसमोर सादरीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष दालनाची संकल्पना राबविण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यातील सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे म्हणाले की, “परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने गिरगाव चौपाटी येथे विशेष दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दालनाच्या माध्यमातून गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी पर्यटकांना समजावून सांगण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे प्रसार होण्यास मदत होईल.”
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले, “गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण अनुभव आहे. विशेष दालनाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची माहिती तसेच विसर्जन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, आदरातिथ्य आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या विविध संधी आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.”
००००
संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply