
राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांपर्यंत शासकीय सेवांचा थेट लाभ पोहोचविणे, जनसहभागातून विविध सेवा उपक्रम राबविणे, नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि शासनाच्या विकासकामांची तसेच योजनांच्या परिणामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, अशा विविध अंगांनी या अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
अभियानातील ‘सेवा सेतू अभियान’ हा नागरिकाभिमुख महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शिबिरातच लाभ देण्याचे नियोजन आहे. यासोबतच प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, शेत-पाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी, प्रलंबित घरगुती वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहन चालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकरी प्रमाणपत्र, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे आदी २२ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अभियानात ‘इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट इनोव्हेटर्स तसेच ग्रामीण भागातील नवनवीन उपाय विकसित करणाऱ्या व्यक्तींना जोडण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इनक्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचा सहभाग घेऊन उत्कृष्ट नवोपक्रमांची तज्ज्ञांसमोर सादरीकरणे आयोजित केली जातील.
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमातून गाव आणि वाड्यांमध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या सहभागातून स्थानिक गरजांनुसार सेवा कार्ये केली जाणार आहेत. स्वच्छता मोहिमेस विशेष महत्त्व देत समुद्रकिनारे, नदीघाट आणि बारवांची स्वच्छता तसेच नियमित स्वच्छतेसाठी स्थानिक समित्यांची स्थापना केली जाणार आहे. रक्तदान, अनाथालय किंवा वृद्धाश्रम भेट, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, गाव दत्तक घेऊन सेवा कार्य, योग-ध्यान, प्लास्टिकमुक्ती, महिला आरोग्य, वंचित मुलांना शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सेलिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, अवयवदान संकल्प, व्यसनमुक्त भारत जागरूकता, पोषण व अॅनिमिया जागरूकता, रस्ता सुरक्षा, जलसंधारण, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा, फिट इंडिया, वीरगाथा व सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग, मतदार जागरूकता व नोंदणी, ‘व्होकल फॉर लोकल’, सरकारी योजनांची जागरूकता आणि विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे अशा उपक्रमांचाही समावेश आहे.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत महत्त्वाच्या व परिवर्तनकारी प्रकल्पांची माहिती संकलित करून त्यांच्या माध्यमातून जीवनमान, सुरक्षा, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि संधींमध्ये झालेल्या बदलांची माहिती व्यापकपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. ‘सेवा ज्योत यात्रा’ प्रत्येक गावात, तर शहरी भागात बाइक रॅलीच्या माध्यमातून आयोजित केली जाईल. प्रमुख ठिकाणी विकसित भारत २०४७ आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन संकल्प घेतला जाईल.
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडीतील मुलांसह मातांचा सहभाग असलेला ‘अंगणवाडी उत्सव’, योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन दीप प्रज्वलित करण्याचा ‘आशीर्वादाचा दिवा’ आणि योजनांमुळे जीवनमानात झालेला सकारात्मक बदल मांडणाऱ्या ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमांचीही आखणी करण्यात आली आहे.
दि. १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’, शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत स्तरावर कला व नाट्य पथकांद्वारे योजनांची माहिती देणारे ‘नमो सेवागाथा’, तसेच धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रे’चे स्वागत करून स्थानिक योजना व विकासकामांवर संवाद साधण्याचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
अभियानाच्या समारोपासाठी दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत ते संसद स्तरावरील लोकप्रतिनिधींचा ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
अशा प्रकारे सेवा वितरणापासून जनसहभागापर्यंत, नवोपक्रमापासून स्वच्छतेपर्यंत आणि विकासकामांच्या माहितीपासून लाभार्थ्यांच्या यशोगाथांपर्यंत विविध घटकांना एकत्र आणत ‘सेवा संकल्प अभियान’ हे विकास आणि संवाद यांना जोडणारे बहुआयामी अभियान म्हणून आकार घेत आहे.
– सचिन अडसूळ,
जिल्हा माहिती अधिकारी,
सिंधुदुर्ग
००००००

Leave a Reply