
मुंबई, दि. २६ : आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आयोजित गणेश विसर्जनाच्या सोहळ्याच्या वेळी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागासाठी दरवर्षीप्रमाणे उभारलेल्या विशेष दालनात भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले.
गणेश विसर्जन सोहळ्यास कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबईच्या महापौर रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्यासह परदेशी पर्यटक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्यउत्सव आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाने या उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरुप दिले. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळाला. विशेषतः येथील वातावरण व नियोजन पाहून आंतरराष्ट्रीय पर्यटक भारावून गेले. हजारो संख्येने लोक एकत्रित आल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेला गणेश विसर्जन सोहळा अनुभवणे या पर्यटकांसाठी आनंदाचा क्षण होता.”
परदेशी पर्यटकांनी केली गणपती बाप्पाची आरती
गणेश विसर्जनाचा हा भव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी’ आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच थायलंड येथून हा विसर्जन सोहळा अनुभवण्यास आलेले पर्यटक आरतीमध्ये तल्लीन झाले. जगभरातील २३ देशांमधील आंतरराष्ट्रीय पर्यटक व पाहुण्यांनी सदर सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या सोहळ्यानिमित्त आलेल्या या पर्यटकांना गणपती मिरवणुकीच्या भव्यतेचे दर्शन घडले. त्याचबरोबर त्यांना गणरायाची श्रद्धेने पूजा करणे, आरतीत सहभागी होणे आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सामील होण्याची संधी मिळाली. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत सज्ज होऊन, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हे पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीमध्ये रमून गेले.
या उत्सवाचे साक्षीदार ठरलेले इटली येथी परदेशी पर्यटक श्री. मार्को यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हा सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. हा उत्सव म्हणजे श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येनी परदेशी पर्यटकांनी गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे मी आवाहन करतो. लाखो लोक एकाच स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना पाहून डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भारतात येऊन हा अनुभव घेणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहे.”
तसेच फिनलँडहून आलेल्या पर्यटक श्रीमती जॉना सुनी यांनी गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याबाबत सांगितले की, “गणेश विसर्जनाचा हा सोहळा माझ्यासाठी अत्यंत अनोखा आणि भावस्पर्शी अनुभव होता. ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषा, भक्तीमय वातावरण आणि हजारो लोकांचा उत्साह पाहून महाराष्ट्राच्या संस्कृतीची भव्यता अनुभवता आली. येथील लोकांचे प्रेम, आपुलकी आणि पाहुण्यांचे केले जाणारे स्वागत मनाला भावले. महाराष्ट्रातील संस्कृती आणि उत्सवांचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी येथे आवर्जून यावे. पर्यटन विभागाच्या विशेष दालनामुळे आम्हाला विसर्जन मिरवणूक जवळून पाहता आली आणि या परंपरेचा अनुभव घेता आला.”अनेक परदेशी पर्यटकांनी गणरायाच्या मनमोहक मूर्तींसोबत छायाचित्रे काढली आणि या अविस्मरणीय क्षणांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणे, हा आपल्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभरात पोहोचेल.”
पर्यटन संचालक विकास पानसरे म्हणाले की, “आमच्या विशेष दालनामुळे पर्यटकांना मिरवणूक पाहण्याची संधी मिळण्याबरोबरच ते गणेशोत्सवाच्या खऱ्या भावनेशी जोडले गेले. परदेशी पर्यटकही बाप्पाच्या जयघोषात दंग होऊन गेले. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही प्रेरित झालो आहोत. गिरगाव चौपाटीवरील हा विसर्जन सोहळा परदेशी पर्यटकांसाठी केवळ एक पर्यटन स्थळ नसून, भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरला. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या निरोपाच्या हृदयस्पर्शी क्षणात सहभागी होऊन या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला. हा अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभर कोरला जाईल.”
यावेळी पर्यटन विभागाचे उप सचिव संतोष रोकडे,पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक संतोष जाधव, पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक सुशील पवार, रविंद्र पवार, पर्यटन संचालनालयाचे मुख्यलेखाधिकारी विठ्ठल सुडे, कार्यकारी अभियंता आकाश चकोर व संचालनालयाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पर्यटनाच्या युवा दूत नवेली देशमुख उपस्थित होत्या.
००००
संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply