थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘महाज्योती’च्या प्रशिक्षण व फेलोशिपसाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा

‘महाज्योती’च्या प्रशिक्षण व फेलोशिपसाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २९ : ‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच पीएच.डी. फेलोशिपचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बैठकीस सदस्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वन मंत्री गणेश नाईक, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे तसेच संबंधित विभागांचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव उपस्थित होते.

‘महाज्योती’मार्फत आतापर्यंत सुमारे ९ हजार ८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, चालू वर्षात सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण, तर ८ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रलंबित सुमारे १२६ कोटी रुपयांच्या देयकांसह प्रशिक्षण आणि फेलोशिपसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचा प्रसार, त्यांच्या साहित्याचे डिजिटलायझेशन, भाषांतर व देशातील विद्यापीठे, महाविद्यालये, ग्रंथालये आणि संशोधन संस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी कालबद्ध प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. आगामी अर्थसंकल्पासाठी आवश्यक प्रस्ताव डिसेंबरपर्यंत कॅबिनेट उपसमितीसमोर सादर करण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीएच.डी. फेलोशिपच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही प्रस्ताव सादर करण्याचे़ तसेच विविध महामंडळांच्या निधीतील अनुशेष दूर करून सर्व संबंधित घटकांना समान निकषांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.