थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची कामे महापालिका, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पूर्ण करावीत – मंत्री डॉ. उदय सामंत

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची कामे महापालिका, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पूर्ण करावीत – मंत्री डॉ. उदय सामंत

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २८ : नाशिक जिल्ह्यातील सातपूर आणि अंबड एमआयडीसी क्षेत्रातील महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांची कामे नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावीत. तसेच ‘एमआयडीसी’च्या मालकीच्या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

मंत्रालयात उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. नाशिक शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा, अग्निशमन सुविधा, आयटी पार्क, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच ट्रक टर्मिनस आदी पायाभूत सुविधांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नाशिक शहरालगत अंबड, चुंचाळे व पाथर्डी येथे ५१५.५० हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त नाशिक (अंबड) औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने नाशिक महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. सध्या नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड आणि सातपूर एमआयडीसी क्षेत्रातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.

हस्तांतरित रस्त्यांची कामे संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून पूर्ण करावीत. तसेच एमआयडीसीच्या मालकीच्या रस्त्यांची सद्यस्थिती, आवश्यक कामे आणि अंदाजित खर्च यांचा समावेश असलेला डीपीआर तयार करून प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. एमआयडीसी क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करणे, दिंडोरी येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी सर्वेक्षण करणे, आयटी पार्कच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करणे, सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे तसेच ट्रक टर्मिनस विकसित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असेही उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस विधान परिषदेचे सदस्य गोकुळ गिते, नरेंद्र दराडे, माजी आमदार किशोर दराडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्तालयाच्या सहआयुक्त मृणालिनी देवराज, अभियंता राहुल बनसोड आदी उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या.

000

गजानन पाटील/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.