थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गरजू बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य

गरजू बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालकांना लाभ

मुंबई, दि. ३० : अनाथ, बेघर, एकल पालक असलेली तसेच गंभीर परिस्थितीत सापडलेली ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालके व त्यांच्या संगोपनकर्त्यांना महिला व बालविकास विभागाअंतर्गत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’च्या माध्यमातून दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. पात्र बालकांच्या पालनपोषणासाठी ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) लाभार्थी किंवा संगोपनकर्त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

बालकांना बालगृहात ठेवण्याऐवजी नातेवाईकांकडे कौटुंबिक वातावरणात राहता यावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महिला व बालविकास विभाग विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यात ही योजना राबविली आहे. अनाथ, बेघर, एक पालक असलेली, आजारी किंवा दिव्यांग पालकांची बालके, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुले, कौटुंबिक हिंसाचार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, बालकामगार, रस्त्यावर राहणारी बालके तसेच बाल कल्याण समितीने काळजी व संरक्षणाची गरज असल्याचे घोषित केलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.

योजनेच्या लाभासाठी बालक महाराष्ट्राचा रहिवासी असणे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येते. अर्जासोबत बालकाचा जन्मदाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बालक व पालक अथवा संगोपनकर्त्याच्या संलग्न खात्याचे बँक पासबुक आणि बालकाचा पालकांसमवेत घरासमोरील छायाचित्र सादर करावे. लागू असल्यास आई-वडिलांचा मृत्यू दाखला आणि शाळेत शिकत असलेल्या बालकाचे बोनाफाईड प्रमाणपत्रही जोडावे.

मुंबई शहर जिल्ह्यात शासनमान्य प्रवास फाउंडेशन आणि मानव विकास फाउंडेशन या संस्था योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. पात्र बालकांचे पालक किंवा नातेवाईक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, स्थानिक बाल कल्याण समिती किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेमार्फत अर्ज सादर करू शकतात. परिसरातील अनाथ व गरजू बालकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिक, शाळा, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, पहिला मजला, ११७ बीडीडी चाळ, वरळी, मुंबई–४०००१८ येथे किंवा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क साधता येईल.

०००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.