थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, १ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

निवृत्तीवेतनधारकांनी ६ रोजीच्या ‘महा-उपलब्धी ॲप’ कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांनी ६ रोजीच्या ‘महा-उपलब्धी ॲप’ कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २: निवृत्तीवेतनाशी संबंधित सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ‘महा-उपलब्धी’ अधिकृत मोबाईल ॲपच्या वापराबाबत ६ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी केले आहे.

वित्त विभाग, मंत्रालय, संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत एमएमआरडीए, न्यू बिल्डिंग, पोडियम सभागृह, जिओ वर्ल्ड ड्राईव्हसमोर, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१ येथे होणार आहे.

‘महा-उपलब्धी’ ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या त्यांच्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, फॉर्म-१६ तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित शासन निर्णय आदी माहिती पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

कार्यशाळेस उपस्थित राहताना मुंबईतील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी पीपीओ क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेला स्मार्टफोन सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे YouTube वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून त्याची लिंक यथावकाश संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘महा-उपलब्धी’ ॲपचा प्रभावी वापर समजून घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असेही अधिदान व लेखा कार्यालयाने कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.