थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच ‘सेवा संकल्प अभियाना’च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यालय परिसराची स्वच्छता केली.

अभियानाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, अधीक्षक नगर भूमापन व भूमी अभिलेख शिवदास गुंड, सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

यावेळी कार्यालय परिसरातील विविध ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली. त्यासोबतच प्रत्येक प्रशासकीय शाखा व विभाग कक्षामध्ये फायलींची शिस्तबद्ध मांडणी, नस्तीकरण व कक्ष स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे आणि नोंदी व्यवस्थित ठेवून कार्यकक्ष अधिक सुटसुटीत करण्यावर भर देण्यात आला.

‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती दैनंदिन कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असली पाहिजे,’ हा संदेश या अभियानातून देण्यात आला. स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध कार्यालयीन वातावरणामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होऊन नागरिकांना जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे सुलभ होते, यावर यावेळी भर देण्यात आला.

‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून स्वच्छतेसोबतच शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा संदेश देत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छ व कार्यक्षम कार्यालयाचा संकल्प केला.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.