थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १८ – मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, यूडब्ल्यूएसारख्या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा निर्णय आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक स्तरावरील तिच्या वाढत्या महत्वाची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी ती जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यास नवे दालन खुले झाले आहे. पूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागत होते; आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असून त्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यूडब्ल्यूए, मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक वातावरणाबरोबरच देशातील प्रमुख वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांच्या परिसंस्थेशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य वाढावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट क्षमता आणि महाराष्ट्राकडे व्यापक प्रमाणात प्रतिभा व संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधिष्ठित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक मजबूत स्तंभ ठरू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यूडब्ल्यूए हे महाराष्ट्राच्या भविष्यदृष्टीतील विकासप्रवासाचे भागीदार बनले असून या भागीदारीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांनी मुंबईतील यूडब्ल्यूए कॅम्पसचे उद्घाटन हे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि भारत, विशेषतः महाराष्ट्र यांच्यातील संबंधांमधील ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे सांगितले. गेल्या ३० वर्षांपासून मुंबई ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील सहभागाचे प्रमुख केंद्र राहिली असून, शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि लोकसंपर्काच्या क्षेत्रात दोन्ही बाजूंमध्ये दृढ भागीदारी निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. यूडब्ल्यूएचा मुंबई कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसेच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर यांनी मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली असून भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणातून ज्ञान, संधी आणि जागतिक स्तरावरील संलग्नता निर्माण करण्याच्या उद्देशाने यूडब्ल्यूए भारतातील नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूडब्ल्यूएच्या मुंबई कॅम्पससाठी गेल्या काही दिवसांपासून करण्यात आलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. विद्यापीठाने तीन भारतीय विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केल्याबद्दल स्वागत करताना, यामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी होणारा परकीय चलनाचा खर्च वाचण्यास मदत होईल, तसेच विद्यापीठाच्या संशोधनकेंद्री कार्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांचे कॅम्पस ‘एज्युकेशन सिटी’मध्ये उभारले जात असून, भविष्यात तेथे सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

00000

बी.सी. झंवर/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *