थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई, दि. २१: वाशिम जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आता अत्यंत दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध होणार असून जिल्ह्याला ‘मोतीबिंदू मुक्त’ करण्याच्या दिशेने राज्य शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्हा प्रशासन आणि ‘जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशन’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या ऐतिहासिक करारावर वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनच्या वतीने कार्यकारी संचालक पूजा दवे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे आपण ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र‘ घडविण्याचे स्वप्न पाहत आहोत. प्रशासनाच्या प्रयत्नांना जेव्हा जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशनसारख्या जबाबदार संस्थेची साथ मिळते, तेव्हा विकासाचे आणि सेवेचे हे प्रयत्न अनेक पटींनी वाढतात. शासनाला समांतर व्यवस्था उभी न करता, शासनाच्याच यंत्रणेला बळ देण्याचा फाउंडेशनचा विचार अत्यंत स्तुत्य आणि विचारपूर्वक आहे. या करारामुळे वाशिम जिल्ह्यालाच नव्हे, तर भविष्यात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून काम करण्यासाठी संपूर्ण राज्याला एक उत्तम ‘मॉडेल’ मिळेल.

एकही व्यक्ती नेत्रसेवेपासून वंचित राहणार नाही- निमेश कंपानी

जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी यांनी यावेळी फाउंडेशनच्या उद्देशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आम्हाला शासनाशी स्पर्धा करायची नसून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. वाशिममधील एकही गरजू व्यक्ती दर्जेदार नेत्रसेवेपासून वंचित राहू नये, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाचे समर्पण पाहून आम्ही केवळ वाशिम जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून येथील नेत्रसेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

वाशिमचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील नेत्रसेवेची सध्याची स्थिती, आवश्यक उपाययोजना आणि या भागीदारीतून साध्य होणारे अपेक्षित परिणाम याविषयी माहिती दिली.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि गुंतवणूक:

या सामंजस्य करारामुळे वाशिम जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांतील आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रतपासणी, आवश्यक शस्त्रक्रिया व अत्याधुनिक उपचार सुविधा सहज उपलब्ध होतील. जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशन २०२६ ते २०३२ या कालावधीसाठी जिल्ह्यात गुंतवणूक आणि सहकार्य करणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पहिल्या वर्षी फाउंडेशनतर्फे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

या कराराअंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक आधुनिक व सुसज्ज करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयांसाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे पुरवणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करणे आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा बळकट करणे या बाबींचा समावेश असेल. या सकारात्मक आणि लोकाभिमुख करारामुळे वाशिम जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असून हजारो रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, जे. एम. फायनान्शिअल फाउंडेशनचे अध्यक्ष निमेश कंपानी, जे. एम. फायनान्शियल होम लोन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शेठ आणि वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पुरी आदी उपस्थित होते.

००००

धोंडिराम अर्जुन/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *