थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २१ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबई उपनगरात गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवादाचा जागर

मुंबई उपनगरात गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकसंवादाचा जागर

मुंबई, दि. २१ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि लोकजागृतीला चालना देत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, सेवा, उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गणेशभक्तांसह रहिवासी, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांशी यावेळी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.

वांद्रे आणि खार परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देत विभागीय संपर्क अधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी कसा घ्यावा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, संबंधित सेवा कुठे उपलब्ध आहेत, तसेच विविध शासकीय उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

वांद्रे पूर्व येथील ‘वांद्रेचा सम्राट’ – वांद्रे सार्वजनिक उत्सव मंडळ, खेरवाडी येथे अध्यक्ष सागर रेड्डी, सचिव स्वप्निल मोरे आणि खजिनदार निखिल कारंडे यांच्या उपस्थितीत लोकसंवाद साधण्यात आला. उपखजिनदार सचिन चावला यांनीही या उपक्रमास सहकार्य केले.

‘वांद्र्याच्या महाराजा’ – खेरवाडी सार्वजनिक गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, खेरवाडी रोड क्रमांक ४, वांद्रे येथे अध्यक्ष सौरभ ननावरे, उपाध्यक्ष विशाल सहानी आणि उपसचिव अनंत बोरसे यांच्या उपस्थितीत नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

खार येथील शिव शक्ती मित्र मंडळात अध्यक्ष विजय मिश्रा, सचिव अनिल सिंग आणि खजिनदार विजू मेनन यांच्या उपस्थितीत गणेशभक्त व रहिवाशांशी संवाद साधण्यात आला. खेरवाडी येथील शांतीलाल कंपाऊंड श्री गणेश उत्सव मंडळात अध्यक्ष प्रवीण शेलार, सचिव सागर जयस्वाल आणि खजिनदार जीत भानुशाली यांच्या उपस्थितीत लोकसंवाद उपक्रम राबविण्यात आला.

खार येथील किंग डॉलर गणेश उत्सव मंडळात अध्यक्ष भूपेंद्र सिंग, सचिव रवी वाघेला आणि खजिनदार विनोद सरोज यांच्या सहकार्याने नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती देण्यात आली.

उत्सवाच्या व्यासपीठावरून योजनांची माहिती

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक गणेश मंडळांना भेट देत असल्याने शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील थेट संवादाचे प्रभावी व्यासपीठ म्हणून या मंडळांचा उपयोग करण्यात आला. माहिती केवळ पत्रकांपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेत संबंधित योजनांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सेवा व योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि संबंधित विभागांशी संपर्क साधण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

२९ सप्टेंबरच्या रोजगार महाकुंभ मेळाव्याची माहिती

लोकसंवाद उपक्रमादरम्यान २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ मेळावा’चीही माहिती युवक आणि नागरिकांना देण्यात आली. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन आणि उद्योजकतेशी संबंधित उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

विशेषतः विद्यार्थी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांपर्यंत रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध संधींची माहिती देत युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी संवाद साधला.

विविध विभागांचा समन्वय

‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क विभागासोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महसूल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन लोकसंवाद उपक्रमाचे समन्वयन केले.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश प्रभाकर अपंडकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला शासकीय योजनांच्या जनजागृतीची जोड देत ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सार्वजनिक उत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग लोककल्याणकारी योजनांची माहिती, उपलब्ध सेवा आणि रोजगाराच्या संधी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी होत असून, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.

000

संजय ओरके/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *