थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र २०२६ : युवकांच्या स्वप्नांना रोजगाराची नवी दिशा; एकाच दिवशी राज्यभर संधींचा महाकुंभ..!

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र २०२६ : युवकांच्या स्वप्नांना रोजगाराची नवी दिशा; एकाच दिवशी राज्यभर संधींचा महाकुंभ..!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, “युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधींचे व्यापक दालन खुले करण्यात येत आहे. दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, राज्यभरातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसमोर अनेकदा योग्य संधी, योग्य रोजगारदाता आणि योग्य कौशल्य यांचा मेळ घालण्याचे आव्हान असते. दुसरीकडे उद्योग-व्यवसाय क्षेत्रालाही आवश्यक कौशल्य असलेले मनुष्यबळ शोधताना अडचणी येतात. याच रोजगारदाता आणि रोजगार इच्छुक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी रोजगार महाकुंभाची संकल्पना आकाराला आली आहे. एकाच दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करून रोजगाराची संधी युवकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्यभर १००० ठिकाणी एकाच दिवशी रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औद्योगिक आस्थापना, MSME, उद्योग संघटना, महाविद्यालये, विद्यापीठे, कौशल्य विद्यापीठे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

“१००० रोजगार मेळावे, एकाच दिवशी” हा केवळ विक्रमी आकडा नसून, महाराष्ट्रातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन, उद्योग आणि कौशल्य यंत्रणा यांना एकत्र आणणारा व्यापक उपक्रम आहे”. राज्याच्या प्रत्येक भागातील युवकांना रोजगाराच्या संधींच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे, उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करणे आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांना प्रत्यक्ष संधीशी जोडणे, ही या उपक्रमामागील प्रमुख संकल्पना आहे.

या उपक्रमाला उद्योग क्षेत्राकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उपलब्ध माहितीनुसार राज्यभर 1,080 रोजगारदात्यांनी नोंदणी केली असून त्यांच्याकडून 60,657 रिक्तपदे उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर 57,648 रोजगार इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभ हा केवळ एक दिवसाचा रोजगार मेळावा न राहता, मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी आणि उमेदवार यांना जोडणारा राज्यव्यापी उपक्रम ठरण्याची क्षमता बाळगतो.

या महाकुंभाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे “रोजगारासाठी उमेदवाराची तयारी”. रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात येत आहे. करिअरविषयक मार्गदर्शन, स्वतःची ओळख प्रभावीपणे करून देणे, मुलाखत व मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्त्व विकास व ग्रूमिंग, कार्यस्थळावरील कौशल्ये, संवाद कौशल्ये तसेच संबंधित क्षेत्रातील रोजगारासाठी आवश्यक तयारी अशा विविध बाबींवर प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सरावाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

म्हणजेच रोजगार महाकुंभाची वाटचाल “नोंदणी → कौशल्य व मुलाखत तयारी → रोजगार मेळावा → निवड → प्रत्यक्ष नियुक्ती” अशा सर्वसमावेशक प्रक्रियेतून होत आहे. उमेदवाराला केवळ नोकरीची माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, त्याला मुलाखतीसाठी सक्षम करणे आणि योग्य रोजगाराशी जोडणे हा त्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

विशेष म्हणजे रोजगार मेळाव्यानंतरही प्रक्रिया थांबणार नाही. उमेदवारांच्या निवडीचा आणि प्रत्यक्ष नियुक्तीचा मागोवा घेण्यासाठी Post-Drive Tracking ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक निवडीनंतर प्रत्यक्ष नियुक्तीमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी पुढील कालावधीत पाठपुरावा व आढावा घेण्याची यंत्रणा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभाचा भर केवळ उपस्थिती आणि निवडीच्या आकडेवारीवर नसून प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीच्या परिणामावर राहणार आहे.

आजच्या स्पर्धात्मक रोजगार बाजारात शिक्षणसोबत कौशल्य, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि मुलाखतीची तयारी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे दहावी-बारावीपासून पदवी, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी शोधण्याची ही महत्त्वाची संधी आहे.

सांगली जिल्ह्यात 16 ठिकाणी रोजगाराच्या संधी –

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यातही व्यापक नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील १६ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागांतील युवकांना त्यांच्या परिसरातच नामांकित उद्योग व आस्थापनांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या रोजगार महाकुंभाची तयारी म्हणून सध्या जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) क्षेत्रनिहाय रोजगारक्षम प्रशिक्षण सुरू आहे. उमेदवारांच्या गरजा आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विविध क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, स्वयं-परिचय, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास तसेच रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याला येणारा उमेदवार केवळ नोकरीच्या शोधात नसून, नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक तयारी करूनच रोजगारदात्यांसमोर आत्मविश्वासाने उभा राहणार आहे.

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026 हा केवळ रोजगार मेळावा नसून युवकांच्या आकांक्षा, उद्योगांच्या गरजा आणि शासनाच्या कौशल्य विकासाच्या प्रयत्नांना एका व्यासपीठावर आणणारा व्यापक उपक्रम आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घेत स्वतःची नोंदणी करावी, पूर्व-रोजगार प्रशिक्षणात सहभागी व्हावे आणि आपल्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधींचा शोध घ्यावा.

29 सप्टेंबर 2026 हा दिवस महाराष्ट्रातील हजारो युवकांसाठी “नोकरीच्या शोधाचा दिवस” न राहता “नव्या करिअरची सुरुवात करण्याचा दिवस” ठरावा, हीच रोजगार महाकुंभामागील खरी अपेक्षा आहे. संधी मोठी आहे-व्यासपीठ राज्यव्यापी आहे- आता गरज आहे ती युवकांनी एक पाऊल पुढे टाकण्याची!

००००

इनुजा शेख,
सहायक आयुक्त,
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
सांगली

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *