थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सोलापूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान अंतर्गत सर्व विभागांनी नागरिकांना योजनांचा लाभ देऊन अभियान यशस्वी करावे -अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

सोलापूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान अंतर्गत सर्व विभागांनी नागरिकांना योजनांचा लाभ देऊन अभियान यशस्वी करावे -अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

संबंधित विभागांनी अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ, रील्स आणि छायाचित्रे संकलित करून जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या diosur@gmail.com मेलवरही पाठवावेत.

सोलापूर, दि. १६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच उपविभाग व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवा संकल्प अभियान अनुषंगाने आयोजित बैठकीत अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी रोहियो अंजली मरोड, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार पूनम दंडीले, तहसीलदार दिनेश पारगे हे प्रत्यक्ष तर अन्य सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी शासन निर्णयातील सर्व सूचनांची संबंधित यंत्रणांना सविस्तर माहिती दिली. अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन, लाभार्थ्यांची निवड, शासकीय योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे, सेवा शिबिरांचे आयोजन आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अभियानाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘सेवा सेतू अभियानांतर्गत’ प्रत्येक तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत नागरिकांची अर्जप्रक्रिया पूर्ण करून शिबिरातच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे.

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद वाटप, शेत व पाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, घरगुती वीज जोडणी, आधार कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच 7/12 व 8-अ नोंदी अद्ययावत करणे आणि जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांना जमिनीच्या मोजणीशी जोडणे यासारख्या सेवांचाही समावेश आहे.

युवा व नवोपक्रमांना प्रोत्साहन

राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि ग्रामीण भागात नव्या उपाययोजना विकसित करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इनक्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचाही यात सहभाग घेण्यात येणार आहे.

गावागावांत ‘सेवा माझे योगदान’

प्रत्येक गाव व वाड्यात ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग घेण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता मोहीम, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, महिला आरोग्य, जलसंधारण, कचरा वर्गीकरण, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, मतदार जागृती आणि सरकारी योजनांची माहिती अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कार्यक्रमांसाठी गट विकास अधिकारी, तर शहरी भागातील कार्यक्रमांसाठी मुख्याधिकारी किंवा वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

‘सेवा ज्योत यात्रा’, कला-वक्तृत्व स्पर्धा आणि अंगणवाडी उत्सव

‘विकसित भारत-2047’च्या संकल्पनेचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक गावात ‘सेवा ज्योत यात्रा’, तर शहरी भागात बाइक रॅली आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

शासकीय व खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रांवर माता व बालकांसाठी कार्यक्रम, आरोग्य-पोषण योजनांची माहिती, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात येणार आहे. यासाठी विविध विभागांनी लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासनाच्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांच्या ‘बदलाची गोष्ट’ या स्वरूपातील यशोगाथा व्हिडिओ व रील्सच्या माध्यमातून संकलित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

17 सप्टेंबरला मानवी रांगोळी; 2 ऑक्टोबरला ‘नमो सेवागाथा’

17 सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजना, राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर आधारित मानवी रांगोळी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक साहित्याचा वापर करून कला, पर्यटन, निसर्ग व संस्कृतीवर आधारित रांगोळी काढण्यात येणार आहे. कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, 2 ऑक्टोबर 2026 रोजी तालुका स्तरावर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

17 ऑक्टोबरला ‘जनसेवक महाकुंभ’ने अभियानाची सांगता

अभियानाच्या सांगतेनिमित्त 17 ऑक्टोबर 2026 रोजी ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरापासून संसदेपर्यंत काम करणारे लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार असून, विकसित भारताबाबत आपले अनुभव मांडणार आहेत. त्यानंतर ‘सेवा संकल्प अभियानाची’ सांगता करण्यात येणार आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर विभागीय समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असतील. राज्यस्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव असतील.

संबंधित विभागांनी अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ, रील्स आणि छायाचित्रे संकलित करून माहिती व जनसंपर्क विभागास उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या diosur@gmail.com मेलवरही पाठवण्याबाबतचे निर्देश अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी  यांनी दिले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *