
पुणे, दि. १६ : जलसंपदा विभागातून निवृत्त झालेल्या अनुभवी अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग राज्याच्या भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग तसेच प्रत्येक महामंडळाच्या स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित आयोजित अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रकल्प समन्वय सचिव जयंत बोरकर, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुदर्शन पगार, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील शेती आणि जलव्यवस्थेसाठी अभियंत्यांनी केलेले काम मोठे योगदान देणारे आहे. पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव होत असून, जलसंपदा विभागातील अनुभवी अधिकारी व अभियंत्यांनी प्रदीर्घ काळात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ विभागाला सातत्याने मिळत राहणे आवश्यक आहे. जलव्यवस्थापन आणि सिंचनाच्या क्षेत्रातही उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर कसा करता येईल, याचा सर्वांनी विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागातील पुरस्कारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद देताना विखे पाटील यांनी प्रत्येक महामंडळासाठी किमान तीन पुरस्कार देण्याची सूचना केली. पुढील वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी तीन ते पाच पुरस्कार ठेवण्यास आपली मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागातील सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
धरणातील पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचविणे हेच उद्दिष्ट- जलसंपदामंत्री गिरीश महाजन
जलसंपदा विभागातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्राच्या जलविकासाला मोठी चालना मिळाली आहे. धरणे बांधण्याबरोबरच त्यातील पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी केले.
जलसंपदा मंत्री श्री महाजन म्हणाले, जलसंपदा विभाग हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. पाइपद्वारे वितरण प्रणाली, ठिबक व तुषार सिंचनामुळे पाण्याची गळती व बाष्पीभवन कमी करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. धरणांतील गाळ काढणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही भविष्यातील महत्त्वाची आव्हाने आहेत. अभियंता गौरव पुरस्कार हा संपूर्ण जलसंपदा विभागाच्या टीमवर्कचा गौरव असून पुरस्कारानंतर जबाबदारी अधिक वाढते, असेही महाजन यांनी नमूद केले.
जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘सॉफ्ट बाबींवर’ भर द्यावा-एकनाथ डवले
जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, वन व पर्यावरण मंजुरी तसेच पुनर्वसनाच्या बाबींचे प्रभावी नियोजन करून त्या बांधकामाच्या कामासोबत समन्वयाने पूर्ण कराव्यात, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. जलसंपदा विभागातील सुमारे सहा हजार तांत्रिक मनुष्यबळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी अभियंता पुरस्कारांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, जलवापर संस्थांचे प्रशिक्षण, सिंचन वाढ आणि लोकसहभाग यासाठी नियोजन करण्याचे आवाहनही डवले यांनी केले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. तसेच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’मध्ये महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
अभियंता गौरव पुरस्कार
या वेळी 2019 ते 2024 या कालावधीतील वैयक्तिक व सांघिक पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. यामध्ये 2019 चे वैयक्तिक पुरस्कारार्थी प्रकाश बाबूराव भोसले, प्रवीण पांडुरंग पारस्कर तसेच सांघिक पुरस्काराचे सांगली पाटबंधारे मंडळ; 2020 चे वैयक्तिक पुरस्कारार्थी निलेश गुरुनाथ भोईर, सचिन पुंडलिक पवार, मंगेश त्र्यंबकराव त्रिपिटे तसेच सांघिक पुरस्काराचे जिगाव प्रकल्प, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ; 2021 चे वैयक्तिक पुरस्कारार्थी समाधान धोंडीबा सर्पेलवार, अरुण रामचंद्र नाईक, सायली राजेंद्र पाटील, प्रमोद पुंजाजी महाले, विजय हरी पाटील तसेच सांघिक पुरस्काराचे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक; 2022 चे वैयक्तिक पुरस्कारार्थी संजीव दगडू चोपडे, गोकुळ श्रावण महाजन, प्रवीण वसंतराव देशमुख, धनंजय महादेव कोकरे, जयपाल संजय चौरासिया तसेच सांघिक पुरस्काराचे रत्नागिरी पाटबंधारे मंडळ आणि नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, 2023 चे वैयक्तिक पुरस्कारार्थी अजित भारत गौड तसेच सांघिक पुरस्काराचे जल हवामान आधार सामग्री प्रक्रिया विभाग, नाशिक आणि 2024 चे वैयक्तिक पुरस्कारार्थी अनिता उदय पराते व राजरत्न महादेवराव रणदिवे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जलसंपदा विभागातील अधिकारी,त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते
00000

Leave a Reply